Sunday, August 18, 2019

मुल्क - दवडलेली सुवर्णसंधी

काल मुल्क बघितला.

'सिल्व्हेस्टर स्टॅलॉन' चा 'फर्स्ट ब्लड' सिनेमा सुरू व्हावा आणि संपेसंपेपर्यंत त्याचा 'सुनील शेट्टी' चा 'बलवान' मूवी बनावा  तसं काहीसं झालं. एक सुंदर कन्सेप्ट, धाडसी प्रयत्न, तगड्या कलाकारांची पूर्ण फौज, सुंदर दिग्दर्शन एवढं असूनही जर चित्रपट शेवटी अपेक्षित उंची आणि परिणाम नं साधता एका
सर्वसाधारण चित्रपटाप्रमाणे 4 टाळीबाज वाक्ये फेकून संपण्यात धन्यता मानत असेल तर त्यात काय मजा राव. जे सत्य आहे ते काळजात भिनायला नको का? तसा परिणाम साधण्यासाठी थोडी अजून मेहनत न टाकता, शेवट असा का बरं गुंडाळलाय? अडीच तासांच्या मूवी मध्ये एवढ्या mature topic मध्ये नवं परखड सत्य आणायचं की जे माहीत आहे त्यावरच दात कोरून चित्रपट संपवायचा?

तसा मूवी वाईट नाही आहे, खरं तर प्रत्येकानं एक वेगळा मूवी म्हणून एकदा बघावा असाच आहे, पण ह्या कन्सेप्ट मध्ये अशी black friday सारखी अजरामर कलाकृती होण्याची ताकत असताना, असा साधासुधा चित्रपट काढणं म्हणजे अंबानींनी मुलीच्या लग्नात सर्वाना बोलवून त्यांची स्वहस्ते फक्त फदफदं-भात वाढून बोळवण केल्यासारखं नाही का होणार?

Casting, acting आणि direction चांगलंच आहे. पण उत्तमोत्तम कलाकार, बेस्ट कन्सेप्ट, आणि अखेरीस प्लॉट मात्र develop होताना एकदमच साधासुधा आणि अपरिणामकारक. कथेला, प्लॉट्स ना शून्य महत्व देऊन, सुंदर चित्रपटनिर्मितीची संधी अक्षरशः स्वहस्ते वाया घालवली आहे. का रे बाबा असं केलंस?

ऍमेझॉन चं आपल्या उंचीएवढं मोठं बर्थडे गिफ्ट यावं आणि मस्त चकचकीत wrapped बॉक्समध्ये बॉक्स काढता काढता अखेरीस 10 रुपयांचा नेलकटर निघावा तसं वाटलं

Acting सूंदर आहेच।
आशुतोष राणा चा अभिनय लाजवाब। तो पूर्ण मूवीत आशुतोष राणा आहे असं त्यानं भासुच दिलं नाही। एकदम वेगळं टोनिंग। मनोज पहावा ला पहिल्यांदा छान रोल मिळाला आणि त्यानं केला देखील मस्त। तापसी आणि ऋषी ला चांगला रोल दिलाय।

पण ऋषी कपूर ला acting साठी एवढे लांब लांब डायलॉग  नाही दिले तरी चालतील हो, तो खूप ताकदवान ऍक्टर आहे। चेहर्यावरून बोलूंद्यात की त्याला।

 रजत कपूर, नीना गुप्ता मागचे उधार चुकवायसाठी नुसतं add केलंय असं वाटलं। दोघाना काहीच स्कोप आणि screentime नाही आहे।

 2:30 तास वातावरण निर्मिती केल्यानंतर खूप साधारण आणि अपेक्षित शेवट, क्लायमॅक्स ला काहीच वेगळं नसलेलं नाट्य. Judge चा अंतिम सामाजिक मेसेज खूपच अतिउथळ वाटला.  ह्याच्यापेक्षा लोकं आजकाल whatsapp वर बरं लिहितात की.
थोडक्यात, कथेमध्ये प्लॉटस आणि घटनांची प्रचंड वानवा वाटली।

इनमिन 2-3 गोष्टीवरच मध्यन्तरानंतरचे कोर्टातले युक्तिवाद दाखवलेत।
 पूर्ण सव्वा तासांच्या कोर्ट scenes मध्ये surprise elements नावालाच एखादं दुसरा असावा। बाकी फक्त उगाचच वारंवार भावनिक ओलावा ।  बरं मूवी इमोशनल म्हणावं तर background music खूपच साधारण वापरलंय। आणि तसे बरेच scenes जमलेतही, नाही असं नाही, पण नाईलाजाने अशा अल्पसंतुष्टी वृत्तीनेच ह्या चित्रपटाला सखोल आणि अप्रतिम कलाकृती होण्यापासून वंचित ठेवलंय

शेवटीशेवटी इतक्या आक्रस्ताळेपणे वकील बाजू मांडताना बघून चुकून दामिनी बघतोय की काय असा भास झाला।

शेवटचं प्रत्येक वकिलाचं आणि जजचं closing argument इतकं सपक आणि बुळबुळीत का दाखवलंय ते काही कळालं नाही।

इतकी heavy starcast घेऊन, इतका मस्त विषय निवडून असा सूंदररीत्या सुरू होणारा मूवी शेवटपर्यंत पोचता पोचता अतिसाधारण बनून गेलाय असं वाटलं.

अर्ध्या पानाच्या मूळ कथेवर पूर्ण अडीच तासाचा चित्रपट काढल्यासारखा वाटला। कथेचा जीव असावा शॉर्ट फिल्मचा आणि त्यात भावनिक प्रसंग टाकत टाकत अडीच तासांचा मूवी बनवण्यात काय मजा आहे राव? बहुतेक लेखकाला त्यांनी, 'बाबारे, ही घे concept. आम्ही जेवून येतो, तोपर्यंत ह्यावर छान कथा लिही', असं सांगितलं असावं.

दिग्गज फलंदाजांची आणि गोलंदाजांची फौज लावून आपण, झिम्बाब्वे विरुध्दची match अगदी मरत मरत एका रन ने जिंकली तर संधी वाया घालवल्याचं दुःख मानायचं की कसंबसं जिंकल्याचा आनंद???