Sunday, July 10, 2016

मला आवडलेल्या गझल्स - बात करनी मुझे



बहादूर शहा झफर, ह्यांचा उदासी प्रकट करण्याचा अंदाज खूपच वेगळा आणी अतिशय भावणारा असायचा।

त्यांची एक गज़ल अशा विषयावर आहे की जिथे कवीचं बोलणंच स्तब्ध झालंय, त्यानें इतकी असहाययता कधीच अनुभवली नव्हती। ती देखील कशी वर्तवली आहे बघा।

----------------------------------------------
बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल, कभी ऐसी तो न थी ।

ले गया छीन के कौन आज तेरा सब्र-ओ-करार,
बेक़रारी तुझे ए दिल कभी ऐसी तो न थी।

उनकी आँखों ने खुदा जाने, किया क्या जादू,
के तबीयत मेरी माइल, कभी ऐसी तो न थी ।

चश्म-ए-क़ातिल मेरी दुश्मन थी, हमेशा लेकिन...
जैसे अब हो गई क़ातिल, कभी ऐसी तो न थी ।

क्या सबब तू जो बिगड़ता है, ज़फर से हर बार,
खू तेरी हूर-ए-शमाइल, कभी ऐसी तो न थी।

बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल, कभी ऐसी तो न थी ।
-
बहादूर शहा झफर
-------------------------------------------------

आज बघूया ह्या गझल च्या स्वैर अनुवादाचा प्रकार. (श्रेय: संजय क्षीरसागर / संदीप)

ती शून्य शांतता, तो असहाय्यतेचा, बेकसीचा रंग, सगळं बोलणंच मुश्कील झालंय, हे असं तुझ्या सोबतीत कधीच अनुभवलं नव्हतं.

तुझ्या मैफिलीचा रंग आज काही वेगळा आहे. सखी तू आज अकारण नाराज आहेस. तुझ्याशी सारखं बोलत राहावं असं वाटणार्‍याला देखिल, आज सुरुवात कशी करावी ते उमजत नाही. (प्रियकर स्वत:लाच विचारतो), तुझं स्वास्थ्य कुणी हिरावलं, इतकी बेक़रारी तर तुला कधीच नव्हती.
आणि थोड्या एका दुसर्‍या अर्थानं, तीच त्याचं हृदय आहे...आणी तो प्रियतमेलाच म्हणतोयं की, ‘बेक़रारी तुझे `ए दिल' कभी ऐसी तो न थी’!

तुझ्या नज़रेच्या या (उदास करणार्‍या) जादूनं, काय झालंय तर स्वतः मी देखिल उदास (माइल) झालोयं.

माझा वेध घेणारी तुझी नज़र क़ातिल तर आहेच. आणि एका नज़रेत ती मला तुझा करते म्हणून, माझी वैरीणही आहे...पण आज तुझी नज़र इतकी कातिलाना झालीये, विकल झालीये, की... मला बोलणंच मुश्कील झालंय.

तू अशी माझ्यावर सतत नाराज का असतेस? तू इतकी अंतर्बाह्य लावण्यवती आहेस, तुझा स्वभाव (खू तेरी), एखाद्या स्वर्गातून उतरलेल्या परीसारखा (हूर-ए-शमाइल) आहे. तुझ्या रुपासारखंच तुझं मन सुद्धा इतकं उमदं आहे की तुझ्यासमवेत असणार्‍यासाठी ही दुनिया जन्नत आणि तू हूर आहेस, आणि तरीही ह्या अशा स्वप्नवत स्थितीत, अश्या तुझ्या सहवासात (तेरी महफ़िल), हे असं का की मला बोलणं देखील मुश्कील व्हावं!!!!....

--------------------------------------------------------------------------------------------------
मेहदी हसनजींच्या आवाजातली, बहादूर शहा झफर यांची ही गझल नक्की ऐका.

No comments:

Post a Comment